संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती हायटेक झाली
- By -
- Oct 09,2023
अहमदनगर जिल्ह्यातील प्रगतशील बाजार समिती असलेली संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समिती 'डिजिटल' बनली आहे. मागील आठवतक शुक्रवारी (दिनांक 22 सप्टेंबर) रोजी संगमनेर बाजार समितीमध्ये शेतमालाचे डिजिटल पद्धतीचे वजनमाप सॉफ्टवेअर अर्थात 'बंतोष प्रणाली'चे लोकार्पण करण्यात आले होते. माजी कॅबिनेट मंत्री तथा आमदार बाळासाहेब थोरात यांच्या उपस्थित आणि शुभहस्ते बंतोष प्रणालीचे संगमनेर कृषी उत्पन्न बाजार समितीत लोकार्पण करण्यात आले.
ह्या कार्यक्रमाला माजी आमदार डॉ. सुधीर तांबे, सभापती शंकरराव खेमनर, उपसभापती गिताराम गायकवाड, सचिव सतीश गुंजाळ, बंतोषचे अधिकारी यांसह सन्माननीय संचालक मंडळ बाजार समिती, विविध पक्षाचे नेते, पदाधिकारी, पंचक्रोशीतील ग्रामस्थ आणि शेतकरी बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
बंतोष प्रणाली ही एक रिअल टाईम डिजिटल ऑक्शन रिपोर्टिंग सिस्टम आहे. ह्यामुळे शेतकऱ्यांना घरबसल्या शेतमालाला मिळालेला भाव समजतो. तर दुसरीकडे शेतकरी, मापाडी, खरेदीदार, आडतदार ह्यांना बंतोष प्रणालीच्या माध्यमातून पावत्या बनवणे आणि त्यांचे रेकॉर्ड ऑनलाईन ठेवणे सोपे जाते. तसेच, वेळ, पैसा, मनुष्यबळ आदींची बचत होत असल्याने बाजार समित्यांकरिता बंतोष प्रणाली फायदेशीर आहे.
संगमनेर बाजार समितीच्या संचालक मंडळाने बंतोष प्रणालीच्या माध्यमातून राज्यातील अन्य बाजार समितीत सुरु असलेले कामकाज पाहिले. त्यानंतर आपल्याही बाजार समितीमध्येही बंतोष प्रणालीचा समावेश करावा, असा निर्णय सर्वांनी एकमुखी घेतला. त्यानंतर आता प्रत्यक्षात बंतोष प्रणालीचे लोकार्पण संगमनेर बाजार समितीत झाले. त्यामुळे राज्यातील मंचर, जुन्नर, शिरुर, राहुरी, संगमनेर, कोपरगाव, पारनेर कृषी उत्पन्न बाजार समित्यांप्रमाणेच संगमनेर बाजार समिती देखील हायटेक बनली आहे.