कांदा निर्यात बंदीमुळे प्रतिक्विंटल दरात मोठी घसरण!
- By -
- Feb 08,2024
कांद्याचे दर नियंत्रणात आणण्यासाठी केंद्राकडून 8 डिसेंबर रोजी कांदा निर्यातबंदीचा निर्णय परिपत्रक काढून घेण्यात आला. यानुसार 31 मार्च 2024 पर्यंत ही कांदा निर्यातबंदी कायम राहणार आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात मोठी घसरण झाल्याचे कांदा उत्पादक शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. निर्यात बंदीनंतर दरात घसरण सतत सुरू आहे. याचा परिणाम बाजार समिती, व्यापारी, निर्यातदार, वाहतूकदार, मजूर, आणि शेड व्यावसायिकांवर होत असल्याचे सांगितले जात आहे.
कांद्याचे उत्पन्न चांगले होत असताना कांदा निर्यातीवर बंदी आणल्यामुळे शेतकरी आणि व्यापाऱ्यांचे नुकसान होत आहे. दिवाळी दरम्यान 80 रुपये प्रति किलो गेलेले कांद्याचे दर 10 ते 15 रुपयांपर्यंत घसरले आहेत. सरकारने घेतलेल्या कांदा निर्यात बंदीच्या निर्णयानंतर कांद्याचे दर सतत घसरतच आहेत. त्यामुळे शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढत आहे.